शृंगारपूर चा सुपाने पडणारा पाऊस असा धुवांधार होता, कि चार हातांवरचा मनुष्य उघड्या डोळ्यांना दिसायचा नाही. एकदा राने, झाडे, सारा परिसर झोडपून पावसाची धुवांधार सर निघून जायची. मग धुक्याच्या दाटीतून पाठीवरचा प्रचित गडाचा बेलाग कडा दिसायचा. तिथे उगवून खाली घोड्यासारख्या उड्या घेत प्रचंड वेगाने धावणारी शास्त्री नदी आणि बाजूचे अनेक ओढे, ते प्रचंड धबधबे आणि पाण्याचा खळखळाट निसर्गाची ती अद्भुत जादू पाहताना युवराजांच्या डोळ्याचे पारणे फिरायचे.
वर्षातून गौरीच्या सणाला माहेरी परतणाऱ्या सासुरवाशीनीच्या उल्हासाने पर्जन्यधारा चार महिने नुसत्या धिंगाणा घालायच्या. शृंगारपूर आणि त्याच्या पाठीशी खड्या असलेल्या सह्याद्रीच्या दोन अजस्त्र डोंगररांगांनी केलेला काटकोन, या दोहींच्या मध्ये अनेक महावृक्ष उभे होते. कधी कधी वाऱ्याच्या अंगात यायचे. तो पिसाटल्यासारखा वृक्षराजींमध्ये घुसायचा आणि वेळूचेच नव्हे तर महावृक्षांचे अंग पिळवटून काढायचा.
“कविराज, काय करायचं?”, एकदा वैतागून शंभूराजांनी विचारले.
“कशाचं राजन?”
“इथं शृंगारपुरात काव्यलेखनाचा आनंद आणि निसर्गाचा सहवास लाभतो. पण तेवढ्याने आमची तृष्णा भागात नाही. आमची अवस्था जळाविना मासा अशीच आहे.”
आमच्या आबासाहेबांना कर्नाटकाच्या मोहिमेवरून माघारी वळायला अजून दीड-दोन वर्षे लागतील.
काव्यानंदाच्या कैफात मेंदूची तहान भागात होती, पण अंगातल्या सळसळत्या मर्दानी रक्ताचे काय करायचे? शंभूराजांची आणि कविराजांची मसलत झाली. व्यायामासाठी पाच मोठे आखाडे बांधायचे ठरले. शंभूराजे शृंगारपूरी आल्याची वार्ता सर्व प्रभावळी प्रांतात झाली होती. त्यामुळे अनेक तरणीताठी पोरे रोज त्यांच्या अवतीभवती गोळा होऊ लागले. युवारांजासमवेत तालीमबाजीचा आनंद उपभोगू लागले. दाभोळ आणि राजापुरकडच्या बंदरात येणाऱ्या फिरंग्यांकडून एक नवी गोष्ट समजली होती. तिकडे सातासमुद्रापार म्हणे राजाचे बारमाही खडे लष्कर असते. मराठा गड्यांसारखी भातशेती आणि हिवाळ्याउन्हाळ्यात तलवार हाती, अशी तऱ्हा तिकडे नसते.
सर्वानुमते निर्णय झाला. चेऊळ, दाभोळ आणि राजापूर बंदरातून मोठ्या पाठीची, जाडजूड हाडापेरांची, उत्तम पैदाशीची घोडी विकत आणायची. प्रभावळीतलीच धाडसी पोरे गोळा करून तूर्त किमान नवे दोन हजारांचे अश्वदळ बांधायचे. तेव्हा सरदार विश्वनाथ बोलले, “युवराज, शृंगारपुरात तुमच्या दिमतीस पाच हजारांची फौज असताना हे आणखी कशासाठी?”
“आमचं हे नाव अश्वदळ मोठं हिम्मतबाज असेल. ते आम्ही अश्या इर्षेने बांधू कि, जिथं-तिथं हि घोडी भरारी मारतील, तिथं-तिथं ती ‘शृंगारपुरी अश्वदौलत’ म्हणून ओळखली जाईल.”

ठरल्या प्रमाणे गोष्टी पार पडत होत्या. नव्या उत्तम घोड्यांची खरेदी झाली. शंभूराजांनी सामान्य कुणबी, बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतून सारे कष्टाळू वीर आपल्याभोवती गोळा केले. प्रत्यक्ष युवराजांच्या फौजेत झुंजायला मिळणार ह्या कल्पनेने माळामुरडावरचे ते काटक वीर इर्षेने पुढे सरसावले.
घोडदळाला आकार येऊ लागला. लांबलांबच्या दौडी सुरु झाल्या. समोरचा प्रचित गडाचा काटकोनी कडा चढायला खूप अवघड. तरीही ते तरणेताठे वीर इर्षेने घोडी वर घालायचे. त्या उभ्या कडसरीच्या वाटा चढताना घोडी चरचरा वाकायची. घामाघूम व्हायची. उद्या जळातून, चिखलपाण्यातून अगर आगीतुनही घोडी पुढे दामटायची जय्यत तयारी शंभूराजे करून घेत होते.
अशाप्रकारे शंभूराजांनी शृंगारपुरात नवं अश्वदळ उभे केले.
great…