संभाजीराजे थोरल्या राजांच्या महालात आले. त्यांना आदराने मुजरा करत बोलले, “आबासाहेब, आशीर्वाद द्या. आज दुपारीच आम्ही निघतो आहोत.”
“कुठे?”
“दुसर कुठे जाणार? शृंगारपूरलाच! आपला हुकूम शिरसावंद्य.”
शिवाजीराजे क्षणभर थबकले. पुन्हा मायेनं आपल्या पुत्राचे खांदे पकडत बोलले, “अस कसं? आपण उद्यापर्यंत थांबा. त्याच वाटेने तर आम्हाला कर्नाटकाकडे निघायचं आहे. बोलत बोलत जाऊ संगमेश्वरपर्यंत.”
दुसऱ्या दिवशी दुपारी दहाबारा खाश्या पालख्या बाहेर पडल्या. राजांनी शंभुराजांना मुद्दामच आपल्या अंबारीवरील हौद्यात बसवून घेतले होते. संगमेश्वरजवळची नदी ओलांडल्यावर युवराज शृंगारपूरकडे, तर थोरले महाराज सरळ पुढे कर्नाटकाकडे कूच करणार होते.
एकाएकी संभाजीराजांचा कंठ दाटला. ते बोलले, “आबासाहेब, आपण नुकतेच एक दीर्घ आजारातून उठला आहात. एवढा हातातोंडाशी आलेला युवराज मागे ठेवून राजांना मोहिमेवर निघावं लागतं, त्याच खूप वाईट वाटत आबासाहेब”
“शंभू, धीराने घे. सारं काही ठीक होईल.”
“नाही आबासाहेब, हे मनाला पटत नाही. आपण ह्या वयामध्ये मिहिमेस निघावं आणि आम्ही दाढीमिशा फुटल्या असतानाही शृंगारपूरला गुहेत प्रेतासारखे पडून राहावं? युध्दाच्या आणि मोहिमेच्या कल्पनेनं आमच्या धमन्या पेटतात. आतून अंगरखा आम्हाला जाळत राहतो… जाऊ दे. काय करणार? आम्ही ते राजीयांच्या खप्पा मर्जीने धनी!”
शंभूराजांच्या उरातल्या आगीची आणि इर्षेची भाषा राजांना चांगली कळत होती. ते कष्टी सुरात बोलले, “युवराजकडे अन्याय झाला तर राजाकडे सहज जाबसाल करता येतो शंभुबाळ. पण खुद्द राजवरच जेव्हा अन्यायाचे दृश्यअदृश्य आघात होतात, तेव्हा त्याच्यासाठी न्यायाच्या पायऱ्या कुठे राहतात?”
संगमेश्वर जवळ आले, दात अरण्यातून पथके पुढे सरकू लागली. पितपुत्र दोघेही ताततुटीच्या कल्पनेने हवालदिल दिसू लागले. शंभूराजांनी थोड्याशा खालच्या पट्टीत आपली रुखरुख व्यक्त केली, “आबासाहेब, आमचं तकदिरच फिरलं आहे म्हणायचं. मर्दाच्या तलवारी कोनाड्यात गंजत पडल्या आहेत आणि करकुनांच्या लेखण्यांना द्वेषमस्तराचे, सुडाचे दात फुटले आहेत. म्हणून तर आमच्या नशिबी रणांगणाऐवजी शृंगापूर आलं!”
त्यांनी मायेनं शंभूराजांच्या हाताचा पंजा आपल्या हाती घट्ट पकडला. क्षणभर त्यांना गुदमरल्यासारखे झाले. ते कण्हल्यासारखे बोलले, “बस आम्ही इतकंच सांगू, शंभुबाळ, तुमच्यासाठी आज रायगड सुरक्षित नाही. दुर्देवाने आज आम्ही तुम्हाला रायगडची देऊ शकत नाही आणि त्याच वेळी आम्हांला आमच्या होणहार, प्राणप्रिय शंभुलाही गमवायच नाही!”
शंभूराजे चिडीचूप झाले. पण आपल्यासाठी रायगड असुरक्षित आहे, हे काही त्यांना पटत नव्हते.शास्त्री नदीचे छोटेसे पात्र फोऊज ओलांडू लागली होती. इथले रान काहीसे गुढमय वाटत होते. त्या किर्र वृक्षराजीकडे नजर फेकत शिवाजीराजे म्हणाले, “शंभुबाळ, यापुढे काही महिन्यांचा निवांतपणा तुम्हाला लाभणार आहे. आपल्या काव्यप्रेमाबरोबर आणि विध्याभ्यासबरोबरच इथल्या मातीचे नानाविध रंगही पारखून पहा. ज्या मुलखात उद्या तुम्हाला राज्य करायचं आहे, तिथली माणसं ओळखायला आणि वाचायला शिका. लक्षात ठेवा, आम्हा मराठ्यांमध्ये अशा काही नीच जातीप्रवृत्ती आहेत की – स्वतःच्या किंचित स्वार्थासाठी त्या आपले राज्य आणि राजसुद्धा बुडवायला मागेपुढे पाहणारं नाहीत!”
मूळ स्रोत : संभाजी – विश्वास पाटील या पुस्तकांमधून एक छोटासा भाग