शंभुराजे बहादूरगडावर…

बहादूरगडाचे दार

शंभुराजे बहादूरगडावर – सह्याद्रीच्या छावा मोगलाईचे रान तुडवत वेगाने पुढे धावत होता. त्याच्या सोबत असलेली मुसलमानी पथके बडा हैदोसदुल्ला करत जोराची दौड करत होती. हा प्रसंगच मोगलाईसाठी अजब होता. मराठ्यांचा युवराज विनासायास मोगलांच्या गळाला लागणार होता. ह्या नुसत्या वार्तेने दिल्लीकर औरंजेबापासून ते दक्षिणेतील दिलेरखानापर्यंत सर्व अमीर-उमरावांना आनंदाच्या उकळ्याच फुटणार होत्या.

जसजसा आपला मुलुख पाठीमागे पडू लागला, तसे शंभूराजे मनातून कावरेबावरे होऊ लागले. पेटत्या वणव्यातून जीव वाचवण्यासाठी एखादा मनुष्य बाहेर पडतो, तेव्हाही वाटेतील निखाऱ्याचे कण चटके देतात, हिंस्र चावे घेतात, तशीच अवस्था शंभूराजेंची झाली होती. त्यांच्या ह्या करणीमध्ये धाडसापेक्षा जीवघेणा धोकाच अधिक होता. वाठार गावाजवळ दिलेरखानाचा सुभेदार एखलासखान आणि त्याचा पुतण्या गैरत हे दोघे तीन हजाराची खडी फौज घेऊन युवराजांची वाट पाहत उभे होते. त्या दोघांनीही युवराजांचे जंगी स्वागत केले. दिलेरखानाने या आधी दिलेल्या वचनाप्रमाणे सारे काही घडत होते.

दिलेरखानाला अजून बरीच दौड पार पाडायची होती. कदाचित आपल्या युवराजांचे मन वळवण्यासाठी स्वतः शिवाजीराजे आपली बलाढ्य फौज घेऊन पाठलाग करतील, याचीही भीती खानाला वाटत होती. म्हणूनच त्याने डेरेदांडे गुंडाळून बहादूरगडचा रस्ता चालायचे आदेश आपल्या फौजेला दिले.

आज शंभूराजे मात्र विलक्षण दबावाखाली होते. आपण स्वराज्याचे नाव वाढवण्यासाठी की बुडवण्यासाठी चाललो आहोत हेच त्यांना उमजत नव्हते. बहादूरगडावर शंभूराजांच्या स्वागतासाठी शहाजने, कर्णे, ताशे अशी मंगल वाद्ये वाजत होती. हत्तीवरच्या खवासखान्यात युवराजांशेजारी दिलेरखान बसला होता. आजच्या मिरवणुकीत उत्सवाचा जलवा होता. थाटमाट होता. परंतु उगाचच कुठेतरी, काहीतरी करपल्याचा भास शंभुराजांना होत होता. भले मिरवणुकीने असो, पण असे शत्रूच्या नगरात निघून जाणे, शिवाजीच्या पुत्राने मोगली मन्सबदारांना कुर्निसात करणे, हा मान कि अपमान? विजय कि पराजय?

युवराजांच्या तोंडाला कोरड पडली. चामड्याची पिशवी तोंडाला लावून ते घटाघटा पाणी पिऊ लागले. परंतु त्यांची तहान मात्र शमत नव्हती.

दोनच दिवसांत रहिमतपुराहून लांबचा प्रवास करत शाही मेणे बहादूरगडावर येऊन पोचले. मोगलांच्या राज्याकडे पळून जाताना कदाचित आपला पाठलाग होईल, प्रसंगी झटापटी उडून तलवारीला तलवार भिडेल, या भीतीपोटीच सज्जनगडावरून बाहेर पडताना शंभूराजांनी दुर्गाबाईंना सोबत घेतले नव्हते. उलट त्यांना जवळच्या मोगली ठाण्यावर रहिमतपूरला आपल्या काही विश्वासू सेवकांमार्फत पाठवून दिले होते. तिथल्या ठाणेदाराने आता त्यांना बहादूरगडाला सुखरूप पोचवले होते. आपल्या भावाला ना कधी आईची सावली लाभली. आजी जिजाऊसाहेबही नाहीत. आबासाहेबांनी शंभूराजांकडे पाठ फिरवली. घरचं एखाद दुसरं मायेचं नको का युवराजांबरोबर म्हणून राणूआक्काही आल्या होत्या बहादूरगडाला.

बहादूरगडावर

दोन महिने लोटले तरी दिलेरखानाचे पुढचे धोरण समजत नव्हते. शत्रूंच्या शिबिरात संभाजीराजांचा जीव नुसता कोंडत होता. बहादूरगडाच्या त्या जालीम हवेलीमध्ये काही केल्या त्यांना झोप यायची नाही. आईभवानीच्या नावाने गळ्यामध्ये बांधलेल्या ताईत ते पुनःपुन्हा आपल्या डोळ्यांसमोर धरत. आपल्या मातीची, मुलखाची आणि विशेषतः लाडक्या आबासाहेबांची त्यांना आठवण दाटून येई.

एके रात्री कसल्याश्या भयंकर स्वप्नाने शंभूराजांचे काळीज कुरतडून टाकले. ते अचानक उठून घाबरे होऊन बिछायतीवर बसून राहिले. आजूबाजूला लिंबाची झाडे वाऱ्याने वाजत होती. शंभूराजांच्या डोळ्यांसमोरून ते भयंकर स्वप्न हलता हलत नव्हते. दिलेरखानाने पेश केलेला तो शृंगारलेला हत्तीच खवळला होता. त्याचे खांबासारखे अवजड पाय शंभूराजांचे अंग तुडवून तुडवून त्यांचे तुकडे तुडके करत होता! युवराजचे अवघे शरीर रक्तबंबाळ झाले होते!

शंभूराजे मोगलांच्या छावणीत गेले होते खरे, पण शरीराने त्यांचे मन मात्र थोरल्या महाराजांच्याच पायाशी होते.

संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.

खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.

संदर्भ: संभाजीविश्वास पाटील’ यांचा पुस्तकातून घेतलेला मजकूर.

You Might Also Like

One Reply to “शंभुराजे बहादूरगडावर…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *