सह्याद्रीचा छावा मोगलांच्या रानात…

शंभूराजे-दिलेरखान

सह्याद्रीचा छावा – शृंगारपूरचा विजनवास सोसवत नव्हता, संपतही नव्हता. त्यात जखमेवर मीठ चोळायचे म्हणून कि काय दिलेरखानाने आणखी एक खलिता पाठवला.

“बदनसीब शहजादे! शंभुराजे! आपल्या कारभाऱ्यांनी दिल इतका खुष केल्यावर अजुन कोणाचा इंतजार करता आहत? तिकडे जिंजीस जाण्याऐवजी भीमेकाठचा पातशाहाची छावणी तशी जवळच नव्हे का? दिलामध्ये कोणतीही आंदेशा न ठेवता आमच्याकडे या. इस्तिकबालके लिए हमारे शामियानेके दरवाजे कबसे बेसबर है”

दिलेरखानाच्या या ताज्या पत्राने शंभूराजे सावध झाले होते. देव्हाऱ्यातले देव थडगी होऊन बसले होते आणि दूर मशिदीवरचा चाँदतारा त्याच्या सैरभैर मनाला खुणावू लागला होता.

दोस्तीचा हात पुढे करणारा दिलेरखानहि कोणी साधा इसम नव्हता उंच ताडामाडाचा, धिप्पाड देहाचा दिलेरखान म्हणजे एक कडवा रोहिला. आपल्या हातून आलामगिरांची अलौकिक अशी सेवाचाकरी घडावी कि औरंगजेबाचेही होश उडतील. एका दिवसात आपण शाही दरबारामध्ये सर्वोच मोहरे ठरून खुद्द पातशाहाने आपल्या पगाडीमध्ये मनाचा शिरपेच लावावा, यासाठी तो अहोरात्र तळमळत होता. आता काबुल-कंदाहारापासून ते बंगालपर्यंत उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाला आव्हान देणारा कोणीही मायेचा लाल उरला नव्हता. मात्र एक शिवाजी संपला कि आपण पृथ्वी जिंकली, असेच आलमगीर खाजगीत बोलून दाखवतो. पातशाहाची अशी नाजूक मनोवस्था झाली असताना जर आपण संभाजी नावाचा शिवाजीच्या कलेजाचाच तुकडा चाटून नेऊन अलामगिरांच्या पायावर पेश केला तर कोण बहार येईल, ह्या एका विचाराने दिलेरखान गेली दोन वर्ष गळ टाकून तळमळत बसला होता.

त्यांनी जोत्याजी केसकरांना गुप्तपणे दिलेरखानाच्या मुखामध्ये पाठवून दिले. परिस्थितीचा अंदाज घ्यायला सांगितलं. हि बाब जेव्हा येसूबाईंच्या ध्यानात आली तेव्हा त्या कमालीच्या धास्तावल्या!

एके सकाळी अचूक वेळ साधून येसूबाई शंभूराजेंच्या पुढे आल्या. आणि अत्यंत नम्र होऊन त्या बोलल्या, संयम पाळा, संघर्ष टाळा. आपल्या पायाजवळ बसलेल्या येसूबाईंची पर्वा न करता शंभूराजे बोलले, “युवराज्ञी, तुम्ही काहीही म्हणा, माना . हा संभाजीच आता तुमच्या स्वराज्याला नकोस झाला आहे.”

“म्हणून काय त्या दगाबाज दिलेरखानाच्या ओट्यात आपण आपली मुंडी ठेवायला निघालात?”येसूबाईच्या डोळ्यात त्वेषाच्या ठिणग्या नाचू लागल्या होत्या.

“तर मग आम्ही इथं थांबुन करावं तरी काय? ह्या स्वराज्याचे युवराज असूनही मोहिमेवर जायचं नाही. आमच्या हक्काच्या राजप्रासादात राहायचं नाही. साधं हजार दोन हजाराचे नव्याने घोडदळही उभं करायचं नाही. रयतेची एखादी शुल्लक फिर्यादी ऐकायची आम्हाला मुभा नाही. तर मग सज्जनगडावर जाऊन आम्ही फक्त टाळ कुटत आयुष्य घालवायचं?” युवराजांनी विचारले.

त्यारात्री येसूबाईंच्या अंगामध्ये खूप ज्वर भरला होता. त्यांच्या ज्वराचे खरे कारण युवराजांना ठाऊक होत. रुग्णाईत येसूच्या मुखावरून हात फिरवत युवराज बोलले, “उगाच घाबरून नका. अतिविचारानं जीवाला त्रास करून घेऊ नका. समजा, उद्या आम्ही मोगलांच्या शिबिरात जाऊन पोचलो, तर असं काय आभाळ कोसळणार आहे? याआधी दस्तुरखुद्द आबासाहेबांनी आमची इवली बोटं पकडून मोगलांचा शामियाना दाखवला नव्हता काय?

येसूबाई कसनुशा हसत बोलल्या, “तेव्हाच आपलं जाणं हा मामंजीसाहेबांच्या राजकारणाचा एक भाग होता.” युवराज, आपल्या ह्या अडाणी सहचारिणीला एक वाचन द्याल? “प्रथम महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सज्जनगडावर जाल? रामदास स्वामीजींचा कृपा-प्रसाद घेऊन नंतरच पुढे झेप घ्याल?”

“हो, दिल वाचन.”

अपमान आणि अवहेलनेच अंगार किती दाहक असतो, याची कल्पना फक्त संवेदनशील, स्वाभिमानी मनुष्यालाच असते. संभाजीराजे आपल्या पथकांनीशी एकदाचे सज्जनगडावर आले. मात्र अलीकडे ते जिथे जिथे जातील तिथे तिथे दुर्दैवाच्या काटेरी फांद्या त्यांचा पाठलाग करत होत्या. ज्या दिवशी युवराज सज्जनगडावर पोचले, त्याच्या नेमक्या आदल्या दिवशी स्वामीजींनी गड सोडला होता. ते कोल्हापूरला निघून गेले होते. आणखी पंधरा दिवस तरी तेथे परतून येण्याची शक्यता दिसत नव्हती.

चार आठवडे गेले. समर्थ रामदासस्वामी अद्यापि गडावर परतले नव्हते. परळी-सज्जनगडाच्या परिसरात फिरून फिरून युवराजांना कंटाळा आला होता.स्वामी अजून कसे परतले नाहीत या विचाराने ते संतापले होते आणि किल्याचे कारभारी वासुदेव बाळकृष्ण यांच्याकडे संतापाने नजर टाकली. वासुदेव बाळकृष्णांची भंडेरी उडाली होती. त्यांनी युवराजांपुढे नम्रतेने हात जोडत सांगितले, “राजे आपण दिलेल्या न्यायनिवाड्यांकडे आणि हुकुमांकडे शक्यतो कानाडोळा करावा, असेच आदेश वरून आलेत.”

“लेखी? पन्हाळगडावरून? आबासाहेबांचे आदेश?”

“तिकडून नव्हे, पण रायगडाहून-राहुजी सोमनाथ आणि इतर मंडळींचे.”

“त्यावर आपण कोणता निर्णय घेतला?”

“सरकार, आम्ही आपली चाकर माणसं. जेव्हा रायगडाहून तोंडी आदेश आले, तेव्हा त्याचा खुलासा करून घेण्यासाठी आम्ही पन्हाळ्याकडे महाराजांकडे दूत पाठवले. मात्र चार मुक्काम ठोकूनही, राजांकडून आम्हांला कोणतंच स्पष्ट उत्तर प्राप्त झालं नाही. सांगा! आम्ही सेवकांनी कोणता अर्थ काढायचा?”

शंभूराजे कारभाऱ्यांपुढे काहीही बोलले नाहीत. मात्र महालामध्ये त्यांच्याच्याने राहवेना. ते राणूअक्कांना म्हणाले, कर्नाटकातून परतून जवळपास आठ महिने लोटले. आमच्या आबासाहेबांनी आम्हाला भेट दिली नाही. नव्हे भेटीस टाळलं आम्हांला. इथे सज्जनगडावर येऊन अडीच महिने लोटले. इथे समर्थांचाही पत्ता नाही. सांगा, आमच्या हातून असं कोणतं पापं घडली आहे कि आम्हांला रायगडाच्या स्वामींनी झिडकारावं? आमच्याच माणसांना, मातीला आणि मुलखाला जर आम्ही इतके परके वाटत असू, तर परमुलखातच सरळ निघून गेलेलं काय वाईट आहे?”

त्या दुपारी माहुलीचे सुभेदार खेळोजी नाईक भणगे युवराजांच्या भेटीसाठी आले. त्यांची थोरल्या महाराजांवर अतोनात निष्ठा होती आणि शंभुराजांवर जीव होता. खेलोजीबाबांना शंभूराजे बोलले, “उद्या मोठी पर्वणी आहे, म्हणूनच पवित्र स्नानासाठी आम्ही आपल्या माहुली क्षेत्रात येणार आहोत! आमच्या आगमनाची कोणालाही खबर देऊ नका. उद्या पहाटे अगदी शांत चित्तानं आम्हाला तुमच्या स्वराज्यात अंघोळ करू द्या.”

३ डिसेंबर १६७८

भल्या पहाटेच आपल्या शृंगारपुरी अश्वदलातले निवडक तीनशे पथक घेऊन संभाजीराजे क्षेत्र माहुलिकडे जायला निघाले. तांबडे फुटता फुटता त्यांची घोडी कृष्णाच्या काठावर जाऊन पोचली. संगमावर पूजापाठ सुरु होते. मात्र संभाजीराजेंच्या लक्ष मुळी त्या पूजेअर्चेमधे नव्हतेच. ते नदीच्या पूर्व किनाऱ्याकडे पुनःपुन्हा वळवून पाहत होते.

नदीपल्याडच्या काठावरील पिकामध्ये अचानक काहीतरी खसखस झाली. एक हिरवा झेंडा इशारा केल्यासारखा वर आला आणि पुन्हा लुप्त झाला. त्या प्रकारचे खेळोजीना आश्चर्य वाटले. एवीतेवी तो शत्रूचाच मुलुख, काय करायचे आपणाला म्हणून त्या म्हाताऱ्या सुभेदाराने तिकडे दुर्लक्ष केले. शंभूराजांनी गडबडीने जामानिमा घातला. डोक्यावर रेशमी जिरेटोप ठेवताच त्यांचे रूप कमालीचे देखणे दिसू लागले-शंभूराजेंकडे पाहताना खेलोजींना साक्षात शिवरायांच आठवले, त्या धुंदीमध्ये ते युवराजांकडे फक्त पाहतच राहिले.

तितक्यात शंभूराजांनी लगाम खेचून आपल्या राखाडी रंगाच्या हैबती घोड्याला टाच मारली. खेळोजीच्या नजरेला क्षणभर भुरळ पडली. युवराजांनी नदीतीरावरून परळीच्या दिशेने घोडा वळ्वण्याऐवजी तो सरळ नदीच्या पात्रात घातला. संभाजीराजांच्या पाठोपाठ त्यांच्या सहकाऱ्यांची घोडीही पाण्यात झेपावली. सूर्य उगवायच्या आधीच पलीकडच्या तीरावर एक मोगली पथकाची रांग केव्हाची येऊन उभी होती. अंगामध्ये जर्द हिरवे सदरे घातलेले ते मोगली घोडेस्वार, शंभूराजांकडे हरकल्या नजरेने बघत होते. त्यांनी हवेमध्ये तलवारी नाचवत , “अल्ला हो अकबर” आणि “जय जय शंभूराजा” असा त्यांनी एकच गिलका केला.

ते अभद्र दृश्य पाहून म्हाताऱ्या खेलोजीचे काळीज चरकले. त्याने आपल्या अंगावरचा वस्त्रांनिशी पुढे पाण्यात उडी घेतली. नंगी तलवार नाचवत आणि शंभूराजेंचा पाठलाग करत खेळोजी ओरडला, “अहो, धाकटं राज कुठं चाललात?”

शंभूराजेंनी गर्रकन मन वळवली. ते दुःखीकष्टी स्वरात गरजले, खेलोजीबाबा, संपलं सारं. यापुढे तुमचा मार्ग निराळा आणि आमचा मार्ग वेगळा.”

“असं काय वादी दुश्मनासारखं बोलताय युवराज? शिवाजीराजांचा पुत्र आणि खानाच्या सावलीला? अहो, पुनव हो कशी उभी राहणार अमावस्येच्या सांगतील?” बस्स राजे, आता या पुढं एकही पाऊल टाकू नका. मुकाट्यानं मागं फिरा. अहो तुमच्या ह्या अश्या वागण्यानं शिवबाच्या काळजाला किती घरं पडतील र पोरा?

शंभूराजेंनी घोड्यावरूनच कृष्णेतलं कुडचाभर पाणी हाती घेतलं आणि ते गरजले, “म्हतारबा, ह्या कृष्णामायेची शपथ घेऊन सांगतो, योग्य वेळ येताच हा संभाजी कोण आहे, कसा आहे याची प्रचिती तुम्हां सर्वांना आणून देईल. सह्याद्रीसह जग जिंकेन आणि मगच तुमच्या मुजऱ्यासाठी माघारा फिरून येईन!”

खेळोजी मुलखाचा चिकट होता. एक वेळ खेळोजीशी दोन हात करणे सोपे होते. मात्र “शंभूबाळ, शंभूबाळ” असं ओरडत जर त्याने युवराजांना कवळा भरून मिठी मारली असती, तर त्या मायेपुढे युवराजांची तलवारच गाळून पडली असती. ती मिठी चुकवण्यासाठी शंभूराजांनी सरळ समोरच्या काठाकडे धाव घेतली.

समोरच्या हिरव्या पिकापल्याड भागामध्ये काय वाढून ठेवले आहे, हेही नेमके ठाऊक नव्हते! पण धाडस हाच मर्दाचा खरा दागिना नव्हे का? आपले आजोबा शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारामध्ये सेवाचाकरी करीत असताना आबासाहेबांनी नव्हते का पुकारले बंड त्या अदिलशाहीविरोधात? आज स्वराज्यातल्या अविश्वशाच्या, अन्यायाच्या गर्तेत असेच सडून मरण्याऐवजी परक्या मुलखात झेप घेऊ, पराक्रमाचे, यशाचे कंगन लेवू आणि पुन्हा आबासाहेबांच्या मंगल आशीर्वादासाठी स्वराज्यात परतून येऊ. त्यासाठी दिलेरखान नामक सुवर्णमत्स्याच्या जबड्यामध्ये धाडसी उडी ठोकण्याशिवाय आज उरले तरी काय आहे आमच्या हातात?

संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.

खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.

संदर्भ: संभाजीविश्वास पाटील’ यांचा पुस्तकातून घेतलेला मजकूर.

You Might Also Like