आबासाहेबांची भेट – सुमारे पावणेदोन वर्षानंतर आबासाहेब कर्नाटकाची मोहीम फत्ते करून पन्हाळगडावर परतणार होते. चारच दिवसांमागे त्यांच्या आगमनाचे वृत्त युवराज आणि येसूबाईंच्या कानावर आले होते. तेव्हापासून पन्हाळगडावर कधी बुलावा येतोय याकडेच दोघांचेही कान लागले होते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी कर्नाटकाहून निघण्याआधी एका साधुच्यामार्फत (साधूचे रूप घेतलेला शिवाजी महाराजांचाच दूत), “आम्ही येतोय, भेटीस या”, असा खलिता शंभुराजांना पाठवला होता. पण तो खलिता शंभूराजांकडे पोहोचण्याआधीच दिलेरखानाच्या हाती लागला. दिलेरखानाने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यामध्ये आणखी दुरावा वाढवावा म्हणून, शिवाजी महाराजांचा खलिता जाळला, आणि त्याने “आमच्या भेटीस येऊ नये” असा खलिता शृंगारपूरला पाठवला.
तिकडे शिवाजी महाराजांना दिलेरखान आणि सर्जा खान भेटणार हि खबर लागली होती. त्यांची भेट होऊ नये यासाठी त्यांनी परळीचा किल्लेदार जिजाजी काटकर यांच्याबरोबर अजून एक मातब्बर आसामी म्हणून शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना पाठवण्याचे ठरवले.
शिवाजी महाराजांनी तसा खलिता देखील पाठवला.
“प्रिय शंभो, काहीनाकाही कारणास्तव आपली भेट होऊ शकली नाही. आपण रायगडावर यावे असे आम्हांस खूप वाटते. पण त्याअगोदर आपण शृंगारपुराहून उठून सज्जनगडावर जावे. तिथेच तुम्हाला पुढचा योग्य मार्ग सापडेल.”
आबासाहेबांनी आपणांस रायगडावर बोलावण्याऐवजी, पन्हाळ्याच्या भेटीस न बोलावता, सज्जनगडावर जाण्यास सांगितले या एकाच वेदनेने ते तडफडत होते. तीक्ष्ण तीरकामठ्यांनी एखाद्या वाघाच्या बछड्याच्या अंगाची चाळण करावी आणि जखमाही बऱ्या होऊ नयेत, त्या जळत, पोळत तशाच राहाव्यात, तसे शंभूराजे बैचेन झाले होते.
“राजन, कृपा करा. आपण धीर सोडू नका.” कविराज कळवळ्याने बोलले.
“ह्याच एका गोष्टींशिवाय अलीकडे आम्ही करतो आहोत तरी काय?” सुस्कारा टाकत शंभूराजे बोलले, “पावणेदोन वर्षाच्या आबासाहेबांच्या जालीम दुराव्यानंतर त्यांच्या भेटीची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. हो, पण आता ना भेट, ना अखबारथैली. युवराज बिछायतीवर तळमळत पडलेले होते. परंतु बिछायतच आगीचा ओहोळ झालेली. त्यामध्ये युवराजचा देह भाजून निघत होता.
येसूबाई पुढे सरकल्या. ज्वराने उष्ण झालेल्या शंभूराजांच्या गौर कपाळावरून आपला हात फिरवत त्या बोलल्या, “इतके भावविवश होत जाऊ नका. हेही दिवस जातील. स्वतःला आवरा.
“येसू, कसं आवरू आणि कसा सावरू गं? इकडे कारभाऱ्यांनी आणि सोयराबाईंनी आमच्या विरोधात महाराजांच्या मंचकाभोवती आमच्या विरोधात अहोरात्र द्वेषाचा धूप जळत ठेवला आहे. साध्या मायेची भुकेलेल्या शिवबाच्या पुत्राच्या नशिबी वडिलांची छायाही नाही! आज रायगडही दुर्जनगड झाला आहे. येसू, आज आम्ही कोणाचे राहिलो नाही!! आमचं कोणी उरलं नाही!!”
संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.
खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.
संदर्भ: ‘संभाजी, विश्वास पाटील’ यांचा पुस्तकातून घेतलेला मजकूर.