शंभूराजे बैचेन – सिंहाच्या नाकावर उंदराने ओरखडा जरी ओढला, तरी तो वनराज त्वेषाने खवळून उठतो. हा शंभूराजा तर मुलखाचा अभिमानी, त्याहून अत्यंत भावनाप्रधान जागृत. उमरही फक्त विशीची. त्यामुळे मुळात अंगातले रक्त गरम. त्यात आपल्या सारख्या यवनी सरदाराकडून सातशे मरगठ्ठयांचे हातपाय तोडण्याचे पातक घडले. त्यामुळेच हा सळसळत्या रक्ताचा, स्वाभिमानी युवराज किती डिवचला गेला असेल ह्या कल्पनेनेच दिलेरखान भयंकर बैचेन होऊ लागला होता! मुख्य म्हणजे त्याला एकाच भीतीने कमालीचे ग्रासून टाकले होते—सलग अडीच-तीन वर्षाच्या अविरत प्रयत्नाने संभा नावाचा अत्यंत मौल्यवान मोहरा हस्तगत झाला होता. आपल्या ह्या एका कृत्याने शिवाजीसह साऱ्या मराठ्यांची झोप उडवली आहे. मात्र आता हा संतापलेला सिंहाचा बछडा जर अचानक गुंगारा देऊन निघून गेला, तर आपली काय इभ्रत राहील?
भूपाळगडाच्या बगलेवरच फौजा थांबुन राहिल्या होत्या. शंभूराजे सलग तीन दिवस आपल्या गोटातून बाहेर पडले नव्हते. युवराज अन्नाला शिवतही नव्हते. तासंतास देव्हाऱ्यासमोर बसून राहायचे. दुधाच्या अर्ध्या पेल्यावरच दिवस काढतात, जिथे त्या सातशे मराठ्यांचे हातपाय छाटले त्या ठिकाणी शंभूराजे रात्रीबेरात्री तासंतास रडत बसायचे. त्यांची ती अवस्था बसून दुर्गाबाईंच्या अंगात ज्वर भरला. संधीचा फायदा घेत दिलेरखानाने खास वैद्य युवराजच्या गोटामध्ये पाठवले. पाठोपाठ मिठाई आणि फळांच्या करंड्या जाऊ लागल्या. हकिमांद्वारे त्याने चापलूसीही सुरु केली. त्या मराठी पथकांचे हातपाय तोडायची शिक्षा त्याने दिलीच नव्हती म्हणे! त्याला ताकास तूर लागू न देता त्याचा पुतण्या गैरतखान यानेच म्हणे तो पाशवी गुन्हा केला.
असेच चार दिवस लोटले. खवळलेला दर्या थोडा शांत झाला आहे. याचा अंदाज दिलेरखानाने घेत तो हळूच शंभूराजांच्या गोटामध्ये घुसला. आणि गरीब गाय बनून आपले डोळे पुसत तो बोलला, ” राजे जो हुआ वो बहुत बुरा था. आमचा गैरतखान कुठे गायब झाला आहे कोणास ठाऊक!
“गैरतच्या फाशीचे असा काय फरक पडणार आहे? उद्या एका पायानं लंगडी अगर एका हातानं थोटी झालेली हि दुर्दैवी माणसं जेव्हा स्वराज्यात परततील, तेव्हा पोरंसोरंही आमच्या तोंडात शेण घालतील. तळाजवळ शिवाजीचा पुत्र असताना किल्ल्यावर असा भयंकर जुलूम घडतोच कसा? रयतेच्या-राजांच्या या प्रश्नाला आम्ही काय उत्तर देणार?”
शंभूराजा हा बुद्धीने अतिशय तल्लख आहे. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत असा विचार दिलेरखानाने केला.
भूपाळगडाच्या बगलेवर दिलेरखानाने जे अत्याचार केले होते, त्याचा खूप खोल धसका युवराजच्या मनाने घेतला होता. वर आपल्या पित्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न देखील करतायत. ह्या दिलेरखानाच्या अंगावर सरळ धावून जावे आणि त्याचा कंठ शोषावा, असेच त्यांना वाटू लागले. एके दिवशी दिलेरखान तणतणत युवराजच्या डेऱ्यात आला. त्याच्या हेऱ्यानी हस्तगत केलेला शिवाजीराजांचा खलिता त्याने शंभूराजांसमोर धरला, आणि गुरकावल्यासारखा बोलला, “हि काय आपल्या बछड्याशी वागायची शिवाजीसारख्या बापाची रीत झाली?”
“संभाजीचे संकट पोचले तर स्वस्थ बसू नका. प्रत्येक गडावर, गडाच्या प्रत्येक बुरुजावर, तटबंदीवर गोळा वाजवावा. आखिरीतक किल्ले लढावं. संभाजीराजे आमचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांचा मुलाहिजा ठेवू नका-” बघितलीत का भाषा आपल्या जन्मदात्या वालिदाची?
दिलेरखानाच्या या त्राग्याने शंभूराजे विषादाने हसले, ते म्हणाले, “असा हुकूम आमच्या पित्याने न काढायचे तर काय करायचे? पोटचा पोर शत्रूच्या शिबिरात पळून गेला म्हणून काय त्यांनी खुषीने आमच्या गळ्यात रत्नहार घालायचा?”
युवराजच्या या प्रतिक्रियेवर दिलेरखानाचा आवाज बंद झाला. एकूणच युवराजांची पहिली मनःस्थिती आता राहिली नाही, मोगली फौजेत ते खूप बैचेन होते. हे त्या चतुर खानाने ताडले. त्या रात्री दिलेरखानाने डोळे जागवले आणि पातशाहाकडे तातडीचा संदेश पाठवला–,
“जहाँपन्हा, मेहेरबानी करा. संभाला मराठ्यांचा शहेनशहा म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ऐलान करा. संभाला चाहणारी मोठी ताकद शिवाजीच्या फौजेत आहे. आपल्या एक खलित्याने बापबेट्यात खूप बेबनाव माजेल. मराठोंकी सल्तनत टुकडोंमे बट जायगी!”
एकूणच संभाजीराजे आपली मोगलांची छावनी सोडून जाऊ नए या एकाच गोष्टींसाठी दिलेरखानाचे प्रयत्न चालू होते.