शंभुराजे मोघलांच्या छावणी – कश्याबश्या स्वराज्यातील वार्ता शंभूराजांच्या कानापर्यंत येऊन पोहचत होत्या. विजापूरची आदिलशाही राजवट धोक्यात येऊन पोचली होती. त्यांचा मुख्य दिवाण मसूदखान याने, “मोगली फौजांपासून आमचं विजापूरच राज्य वाचवा-असं गाऱ्हाणे शिवाजी महाराजांकडे घातले होते. या निमित्ताने मोगलांच्या विरोधात दक्षिणेस आणखीण एक फळी बांधली जात होती. मोगलांच्या आक्रमणाबरोबरच विजापूरकरांना दुष्काळाने ग्रासले होते. अन्नधान्याच्या टंचाईने माणसे आणि जनावरे खंगत चालली होती. म्हणूनच विजापूरच्या मदतीला महाराज धावले. दोन हजार बैलांच्या पाठीवर धान्याच्या गोणी टाकून त्यांनी ती भरीव मदत विजापूरला पाठवून दिली. अशा धावपळीच्या दिवसात आपण स्वराज्यात असायला हवे होते, असे युवराजांना राहून राहून वाटू लागले.
त्यातच शिवाजी महाराजांनी औरंगाबाद जालनाकडे हमला चढवला आहे हे कळताच दिलेरखान शंभूराजांकडे येऊन बोलला, ” जालना चा हमला स्वतःच्या फायद्या नाही चढवला असता आणि आणखीन एक सुरत बेसुरात केली असती तरी आमची तक्रार नव्हती. मात्र आमच्या विजापूरच्या चढाईवरचा दाब इकडे कमी व्हावा, असा तुमच्या अब्बाजानचा मनसुबा आहे. हे काटशहाचे राजकारण खेळण्यासाठीच त्यांनी जालन्याचा जंग पुकारला आहे.
शंभूराजे दिलेरखानाला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात नाही पडले. उलट बुढ्ढ्या मगरीच्या दाढेतून आपल्या कुटुंबकबिल्यासह बाहेर कसे पडायचे, या एकाच विवंचनेनं त्यांना बैचेन केले होते. त्यातच एके दिवशी सेनापती हंबीरराव मोहिते यांचा निरोप घेऊन काही हेर आले, “युवराज, आम्ही सड्या, बहाद्दर सैनिकांची पथके तुमच्याकडे पाठविली आहेत. ती अथणी आणि जवळपासच्या जंगलातून फिरताहेत. त्यांची मदत घ्या. स्वराज्यात लवकर परतून या.”
या निरोपाने शंभूराजेंना खूप बरे वाटले. त्यातच एके रात्री कवी कलश आणि जोत्याजी ह्या जिवलग दोस्तांचा एक गुप्त खलिता येऊन पोचला, “शंभूराजे, सावध! दिल्लीकर पातशहाकडून तुमच्या जीवाला धोका असल्याची खबर मोगलांच्या मिरज आणि रहिमतपूरच्या ठाण्यावर पोचली आहे. केव्हाही कैद होऊ शकता. जाळे तोडा. पाखरासारखी भरारी घ्या.”
दिलेरखानाची पाळख
शंभूराजे बाहेर झेप घ्यायची संधी शोधत होते. पण अहोरात्र दिलेरखान त्यांच्या अवतीभवती रिंगण काढत होता. एके दुपारी त्याने युवराजांना स्पष्ट सांगितले, “शंभूराजे, तुमच्या झेंड्याखाली आम्हाला पन्हाळा जिंकायचा आहे.” खानाच्या बोलण्यातली मेख शंभुराजांना चांगली समजत होती. “म्हणजे पुन्हा भूपाळगडासारखी तुम्हांला आमचीच ढाल करून आम्हाला मोर्च्यावर उभे करायचे आहे! आमच्याच मुलखात नेऊन बदनाम करायचे आहे?”
“बदनामीचा ख्याल कश्याला करता शंभूराजे? आपण तर मोगलांचे सरदार बनणार आहेत. तुम्हाला लवकरच दिल्लीस नेऊ. पातशाहाकडून खिलतीचा लिबास देऊ!”
“मानवस्त्रं कि बेड्या?” शंभूराजांच्या त्या अचानक सवालाने दिलेरची भंबेरी उडाली. परंतु शंभूराजे खूपच सावध असल्याचे जाणवून तोही कमालीचा सतर्क बनला.
अस्वस्थ शंभुराजे
एकीकडे थोरल्या महाराजांची दुःखाने माखलेली चर्या त्यांना बैचैन करत होतीच, परंतु दुसरीकडे भूपाळगडावर तुटून पडलेल्या सातशे मराठ्यांचे थोटके हात लंगडे पाय त्यांच्या डोळ्यासमोर वेताळाच्या दिवट्यांसारखे नाचत होते. आपल्या डोळ्यांच्या वाती रात्रभर जाळत शंभूराजे देव्हाऱ्यासमोर बसून होते. तिथेच दुर्गाबाई येऊन पोचल्या, त्यांनी भरलेला आपला मुलायम चेहरा शंभूराजांच्या पायावर टेकला. त्यांनी हुंदकत हंबरडा फोडला, “युवराज, आमच्या काळजीपोटीच तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषाची पावलं इथं अडखळून पडतात.
दुर्गाबाई सहा-सात महिन्याच्या गरोदर होत्या. शंभूराजांनी आपले डोळे पुसले आणि म्हणाले, “दुर्गा, कसलं ग आमचं भिकारडे तकदीर म्हणायचे! आम्ही शृंगारपुराहून बाहेर पडलो तेव्हा येसूबाईंच्याही पोटात बाळ होते आणि आज अश्या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आमच्या दुसऱ्या बाळासह तुला सैतानाच्या विळख्यात ठेवून आम्ही स्वराज्यात परतून निघून जावे, असा सल्ला तुम्ही आम्हाला देता आहात? आमच्याच मांडवावर फुलणाऱ्या कळ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे भाग्य तरी कधी ह्या दुर्दैवी संभाजीच्या नशिबामध्ये उगवणार आहे कि नाही?
राणूबाई शंभूराजांच्या जवळ आल्या. त्यांचा हात आपल्या मस्तकाजवळ धरत बोलल्या, “शंभूबाळ, शांत व्हा. आमची फिकीर करू नका. आम्हाला घेऊन जाण्याच्या खटपटीमध्ये आपण मात्र स्वतः मोगलांच्या या कैदखान्यात जन्माचे अडकून पडाल. एक वेळ वाईकर जाधवांना माझ्यासारख्या सुना मिळतील. पण शिवाजीराजांच्या स्वराज्याला पुढे तारून धरणारा दुसरा संभाजी मिळणार नाही! दया करा. वेळ दवडू नका. आपल्या थोरल्या बहिणीच्या पदरामध्ये इतकीच ओवाळणी बांधा आणि आपण निघून जा आपल्या स्वराज्यात!”
आबासाहेबांची चिंता
बराच वेळ शंभूराजे तसेच निर्विकार चेहऱ्याने बसून होते. काय करावे, काय न करावे त्यांना काहीच सुचत नव्हते. राणूबाई पुन्हा शंभूराजांच्या जवळ गेल्या. त्यांच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या, “शंभूराजे, आबासाहेबांचे हृदय तुमच्यासाठी किती द्रवते, हे कदाचित तुम्हांला ठाऊक नसेल! आबासाहेबांनी आम्हाला अनेकदा सांगितले आहे–आमच्या शंभुचे काळीज फक्त राजाचे असते तर आम्हाला त्यांचे चिंता वाटली नसती.
पण त्यांच्या काळजाची एक झडप राजाची आहे आणि दुसरी कवीची!अशी माणसे मूलतः खूप धोकादायक असतात. चिडली, रागावली कि हत्तीच्या झुंडीसारखी अंगावर गडगडाट येतील. पण एकदा त्यांच्या मनाचा निचरा सुरु झाला कि, ती धबधब्यासारखी वाहूनही जातात! राजाला असे वाहून चालत नाही. त्याने आपल्या पोटामध्ये विषाचे, द्वेषाचे आणि सुडाचे कुंबही योग्य वेळीच्या वापरासाठी जपून ठेवायचे असतात. आमच्या शंभूच्या काळजात असे काहीच राहात नाही, म्हणूनच आम्हाला त्यांची काळजी वाटते!”
राणूआक्काचा शंभुराजांना दिलासा
बराच वेळ शंभूराजे तसेच बसून राहिले. त्यांचा हात ओढून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत राणूआक्का बोलल्या, “उठा शंभूराजे. गेल्या काही दिवसांमध्ये देव आमच्याशी जणू सारीपाठीचा खेळ खेळत आहे. जेव्हापासून आपण कृष्णाई ओलांडून मोगलांच्या मुलखात आलात, तेव्हापासून आपल्या आबासाहेबांची काय अवस्था झाली असेल? एकही दिवस त्यांना सुखाची झोप लागली नसेल याची खात्री आहे आम्हाला.”
पण सारे नको नको म्हणत असताना तुम्ही आमच्यासोबत इकडे आलातच कश्याला आक्कासाहेब?
“पूर्वी किल्ले बांधताना त्यांचे तट ढासळायचे. बुरुज कोसळायचे. ते बांधकाम पक्का राहावं म्हणून अनेकांनी बांधकामाच्या पायामधे नरबळी दिले. स्त्रियापोरांच्या रक्तामध्ये चुनखडी कालवली. त्याचप्रमाणे माझ्या भाऊराया, तुझ्या ह्या बहिणीची आणि आपल्या गर्भवती लाडक्या पत्नीची पर्वा तू करू नकोस. उद्या नशिबानं तुम्हाला आम्हांला साथ दिली तर आपण पुन्हा सारे जरूर भेटू! पण ते न घडले तरी बेहत्तर! आम्ही मेलो तरी चालेल. पण शिवाजी-संभाजीच्या स्वराज्याचा बुरुज वाऱ्यावादळाची टक्कर देत असाच खडा राहायला हवा.