दिलेरखान कडून शंभूराजेंना दोस्तीचा खलिता

SambhajiRaje DilerKhan Patra

दिलेरखान – शृंगारपुरात शंभूराज्यांच्या वाड्याच्या बाजूच्या गर्द झाडीतून अचानक तांबुसलाल प्रकाश दिसायचा. पहारेकरांच्या हातातले पलितेटेंभे फुरफुरल्यासारखे भासायचे. रानातून वेताळांची पालखीचं चालल्याचा भास व्हायचा. थोड्याच वेळात वाड्याबाहेर एक सांडणीस्वार आणि काही घोडी येऊन थांबल्याचा आवाज ऐकू आला. त्या अनमानधपक्या आलेल्या पाहुण्यांचे आणि सदरेवरील कारभाऱ्यांचे बारीक आवाजात बोलणे चालले होते. तेवढ्यात कवी कलशांचा घोडा येऊन थांबला. कविराजांच्या निरोप वरच्या दालनामध्ये पोचण्याआधी युवराज आपला जामानिमा ठीक करत सदरेवर आले.तिथे उंच समयांच्या मिणमिणत्या प्रकाशात चार पाच मंडळी बसलेली.

दोस्तीचा खलिता

एक पांढऱ्या दाढीतला पन्नाशीचा मुसलमान मियाँ युवराजांची प्रतीक्षा करीत होता. त्यांच्या एकूण हालचालीकडे कवी कलशांचे बारीक लक्ष होते. युवराज सदरेवर दाखल होताच सगळ्यांनी अर्धवट उठून उभे राहिले. तातडीने मुजरे झाले. संभाजी राजांनी बैठक मारत कविराजांना डोळ्यांनीच ‘बोला’ असे खुणावले. तसेच कविराज संकोचून बोलले “तातडीचा खलिता आला आहे – दिलेरखानाकडून .”

दिलेरखान हि कोणी साधीसुधी असामी नव्हती. पातशाही राजकारणामध्ये मुरलेला, प्रसंगी औरंजेबाचा शहजादा मुअज्जम यांच्याशी झगडा केलेला दाऊदजाई जातीचा तो कडवा रोहिला होता. गंगायमुनेपासून ते भीमा-कावेरीपर्यंत अनेक नद्यांचे पाणी प्यालेला तो साठीतला अनुभवी बुढ्ढा होता.

शंभूराजे शृंगारपुरात असल्याची बातमी पूर्ण मुगलछावणीत पसरली होती. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आणि शंभूराजेंना आपल्या मुघलछावणीत आणण्यासाठी दिलेरखानाने शंभूराजेंना खलिता पाठवला.

खलिता वाचन

शंभूराजेंनी कवी कलश्यांना खलित्याचे वाचन करावयास सांगितले. कवी कलश्यांची नजर त्या खलित्यावर फिरू लागली —-

“राजाधिराज, शेर शमशेर, संभाजीराजे भोसले”

दिलेरखान कडून शंभूराजेंना दोस्तीचा खलिता

एखादा मनुष्य जेव्हा यारीदोस्तीखातर आपला हात पुढं करतो, तेव्हा त्याच्या मनातली दुश्मनीची जळमटे जळून खाक होतात, हे आपल्यासारख्या शायर असलेल्या मराठ्यांच्या शहजाद्याला आम्ही अलाहीदा काय सांगावे? मात्र आपण याचाही पक्का खयाल ठेवा कि, कमळाची टपोरी फुले फक्त तालाबातच फुलतात. शेरचा बछडा अरण्यातच खुलून दिसतो. त्याच हिसाबानं आम्ही आपणांस सवाल करू चाहतो की, मराठ्यांच्या राजांचे नेक शहजादे असताना आपण त्या शृंगारपूरचे अंधाऱ्या गुफेत स्वतः ला कोंडून काय करता आहेत?

आपण आपल्या हक्काच्या रायगडाला महरूम झाला आहेत. शेर शिवाजीसारखा वालीद मिळूनही आपण मायेला यतीम झाला आहात. तुमच्या दिलाची धाडकन आम्ही जाणून आहोत. आजवर आपण फक्त मुगलांच्या दुश्मनीबद्दल ऐकले असेल, दोस्तीबद्दल नाही. आमचा दिल साफ नसतं तर राजपुतांच्या तीन तीन पिढ्यांनी आमच्याशी दोस्ताना कश्याला ठेवला असता? म्हणूनच तुम्हांस खुल्या दिलाने अर्ज करतो की, मनामध्ये आंदेश ठेवू नका. आमची दोस्तीची पेशकश ठोकरु नका. आपणांस कोणतीही मुसिबत आल्यास आमच्याकडे तातडीने हरकारे पाठवा, आम्हाला अर्ध्या रात्री उठवा. उमरकी और तजुरबेकी पर्वा किये बैगेर ये बंदा एकी खिदमतमें हाजीर हो जायेगा.”

कवी कलाश्यांची मुद्रा पडली होती. त्यांच्याच्याने पुढचा काही मजकूर वाचवेना.

शंभूराजे मात्र गालातल्यागालात हसत होते. स्वतः ला रोखण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पाण्याचा पाट फुटल्यासारखा त्यांना आपल्या हास्याचा ओघ आवरता येईना. ते खो खो करत पोट धरून हसत होते. दुष्ट औरंगजेबाचा सुभेदार शिवाजीच्या पुत्रालाच प्यारमोहब्बतीचे आवाहन देतो, हि कल्पनाच किती हास्यास्पद म्हणायची!

शंभुराजांचे खलित्यला प्रतिउत्तर

दिलेरखान कडून आलेल्या खलित्याच्या वाचनाबरोबर महालात एक अस्वस्थ सन्नाटा पसरला. खलित्याच्या जबाबासाठी दिलेरचे दूत महालाबाहेर खोळंबून होते. दिवशीची दुपार झाली. दिलेरखान याच्या बैचेन दूतांना शृंगारपूरचे उष्मा सोसवेनासा झाला. त्यांनी शंभूराजांचा एकसारखा पिच्छा पुरवला. तेहवा राजे त्या दूतांवर कडाडले, “जा, सांगा तुमच्या दिलेरखानाला म्हणावे, — आपण पढतमूर्ख आहेत, म्हणूनच पेडगावला राहता ते फारच चांगलं! वळचणीचं पाणी पुन्हा आढ्यावर चढणं जसं अश्यक्य, सरितें सागर कवेत घ्यायचा सोडून पुन्हा सर्पासारखा पोळ्या उगमाकडे उलटा वळसा घेणं जसं अश्यक्य, तशीच मोगली सुभेदारानं शिवाजीच्या पुत्रासी दोस्ती करायची अभिलाषा बाळगणं, हे मूर्खाचच नव्हे तर शतमूर्खाच लक्षण आहे!”

संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.

खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.

You Might Also Like

2 Replies to “दिलेरखान कडून शंभूराजेंना दोस्तीचा खलिता”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *