छत्रपती सिहांसनाच्या पंचपायऱ्यांचे महत्व – गजापूर आणि विशालगडच्या पश्चिम कडेवर सूर्याची तिरकस सोनेरी किरणे रांगत होती. मावळतीच्या त्या किरणांमध्ये शंभूराजांची चर्या फार मोठी मोहक दिसत होती. त्यांच्या जिरेटोपावरील पाचूंच्या रत्नमाळेचा एक शेव सुटला. तो हलकेच आपल्या हाताने बाजूला खेचत शिवाजीराजे बोलले,
“शंभो, आपलं रायगडचं सिहांसन नीट डोळ्यांनी पाहिलं कधी?”
“अनेकदा !” शंभूराजे हसत बोलले.
“शंभो, आज मुद्दाम ही गोष्ट आम्हाला तुमच्या निदर्शनास आणायची आहे. पित्याच्या गादीवर वारसहक्कानं बसायचा अधिकार युवराजांना जगभर मिळत असेल, पण रायगडाची राजगादी जगापेक्षा वेगळी आहे.”
“म्हणजे आबासाहेब?”
“तेच सांगतो शंभूराजे. वारसाधिकाराच्या हक्काने रिकीबामध्ये पाय ठेवून टाच मारायची तुम्ही बिलकुल घाई करू नका! रायगडाच्या सिहांसनासमोर जाऊन पुन्हा एकदा उभे राहा. डोळे उघडे ठेवून त्या पवित्र तख्ताकडे पुनःपुन्हा पाहा. आमच्या पंचपायऱ्यांच्या सिहासनाचं नीट दर्शन घ्या!

“पहिल्या पायरीकडे तुम्ही जेव्हा बारीक नजर टाकलं, तेव्हा मोराच्या रुंद दिसावेत तसे तुम्हाला अनेक डोळे दिसतील. ते डोळे आहेत बारा मावळातल्या आणि छत्तीस नेरातल्या गरीब शेतकऱ्यांचे, त्यांच्या गाईगुरांचे. जेव्हा त्या पहिल्या पायरीचा तुम्ही कानोसा घेऊलागाल, तेव्हा कृष्णा, भीमा, गोदावरीसारख्या पवित्र नद्यांच्या पोटातला खळखळाट आणि चैतन्य ऐकू येईल तुम्हांला!
“जेव्हा तुम्ही दुसऱ्या पायरीकडे पाऊलटाकाल, तेव्हा सह्याद्रीच्या दरीकंदरात अगर दर्याच्या पोटात खोदलेल्या साडेतीनशे किल्ल्यांचे आणि दुर्गांचे तुम्हांला दर्शन घडेल. तुम्ही अधिक समीप जाऊन दुर्गतटावरचे फत्तर जेव्हा पाहाल, तेव्हा तुम्हाला आपल्या अनेक धारकऱ्यांच्या रक्ताच्या नक्षीने रेखलेले दिसतील…
“जेव्हा तिसऱ्या पायरीवर तुम्ही पाऊल टाकाल, तेव्हा तिथे तुम्हांला दर्शन घडेल आऊसाहेबांचं –जिजाबाईचं आणि आपल्या मावळी मुलखातल्या हजारो लेकीबाळीचं . ह्या माताभगिनींनी स्वराज्यासाठी वैधव्य सुखाचं मानलं. आपले कर्ते पुत्र हिंदवी स्वराज्यासाठी बहाल केलं. तिथेच तुम्ही ऐकाल अनेक माताभगिनींच्या चुरडल्या काकणांचे किणकिणाट!
“चौथ्या पायरीवर तर तुम्ही जपूनच पाऊल टाका. तिथे तुम्हांला तुकोबांची अभंगवाणी ऐकायला मिळेल. ज्ञानेश्वरांच्या अवीट विराण्या ऐकाल तिथे तुम्ही!. रामदासांसह साऱ्या संतसज्जनांचा मेळा भेटेल तिथे तुम्हाला.
“आणि जेव्हा तुम्ही पाचव्या पायरीवर पोहोचाल, तेव्हा सह्य पर्वतीच्या अंगावरची सारी उंच शिखरं तुमच्याकडे मोठ्या आशेनं, आस्थेनं आणि श्रद्धेनं टकमक पाहत असल्याचं जाणवेल तुम्हांला. अपूर्ण, अर्धवट स्वप्नांनी बैचैन झालेला आपला भूतकाळ तुमच्याकडे मोठ्या आशेनं पाहील . न भरलेल्या जखमा तुमच्याकडे दवा मागतील. तुमच्या हातून महान, मंगलकारी असं काहीतरी घडावं म्हणून उगवतीची किरणं तुम्हाला दुवा देतील. अशा रीतीने शंभू, हे मर्द गड्या , भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळ हरणांच्या पाडसासारखे तुमच्या पावलातघुटमळतील.
“जेव्हा त्या पंचपायऱ्यांचं परिपूर्ण दर्शन तुम्हला घडेल, तेव्हा माझ्या प्रिय पुत्रा, तुम्ही तुमच्या मनाला फक्त एक साधा सवाल करा. ह्या प्रचंड जबाबदाऱ्या, ना सुटलेल्या प्रश्नांच्या गोणी आणि रयतेच्या पर्वप्राय इच्छा-आकांक्षांची ओझी उचलण्याची हिम्मत खरोखरच तुमच्या उरात आहे का? तसं तुम्हांला पटलं तर स्वतःवरच्या पूर्ण विश्वासानं, इथल्या मातीवरच्या निष्ठेनं स्वराज्याच्या पवित्र सिहांसनावर खुशाल जाऊन आरूढ व्हा! परंतु स्वतःच्या कुवतीबद्दल एवढीशी जरी शंकाआली, तर मात्र त्या सिहांसनाच्या वाऱ्यालाही थांबू नका. अंगात कफनी घाला आणि एक गोसावी बनून खुशाल अरण्याकडे चालते व्हा.”
धन्यवाद.. तुमच्या या पोस्टमुळे ही समजल.. कृपया आणखी पोस्ट टाकावे