भूपाळगड
भूपाळगड – एके दिवशी दिल्ली औरंगजेबाकडून दिलेरखानासाठी खलिता आला होता. खलित्यात औरंगजेबाचे शब्द डोळे फाडफाडून वाचताना त्याला गुदमरल्यासारखे वाटू लागले होते,
“दिलेर, रोज ऊठसूट आपण त्या संभाजीचा जुलूस काढता अशी खबर आम्हाला मिळते आहे. नाकापेक्षा मोती जड होऊ देऊ नका. दुश्मनाचा बच्चा आपल्या छावणीत आला आहे, त्याचा फायदा घ्या. आपल्या लष्करात नेहमीच त्याला ढालीसारखा आघाडीवर ठेवा. मगरमठ्ठ्यांच्या मुलखावर छापे घाला. गनिमांचं जास्तीत जास्त नुकसान करा.”
बक्षीसाऐवजी या कानउघाडणीने दिलेरखान खूप दुःखी झाला. संभाजीराजे आपल्या कचाट्यात सापडलेच आहेत. त्यांचा वापर करण्याची नामी संधी साधने हे दिलेरच्याही हिताचे होते. विजापूरच्या वाटेवर बाणूर गावाजवळ असलेले “भूपाळगड” त्या किल्ल्याची तटबंदी मात्र बडी मजबूत. त्या किल्यावरच्या सुभेदार पोलादाच्या छातीचा आहे. पण हा किल्ला हाताशी लागला तर विजापूरच्या नाकाला वेसण घालणेही खूप सोपे जाईल. या विचाराने दिलेरखानाने भूपाळगडावर जंग करायचे ठरवले.
बहादूरगडावरून भूपाळगडाच्या मोहिमेची सूत्रे वेगाने हलवली जात होती. शंभूराजे चिंताग्रस्त आपल्या महालात बसून होते. एक तर या मोहिमेबाबत दिलेरखानाने कोणतीही उघड चर्चा केली नव्हती. शिवाय दोनच दिवसांमागे शृंगापुराहून कलशांचे आणि रायगडाहून येसूबाईचे गुप्त पत्रे एकाच वेळी अली होती. दोन्ही पत्रातला मजकूर जवळपास सारखाच होता. “युवराज, स्वस्थ न बसता काहीतरी करा. आपण मोगलाईत निघून गेल्यापासून इकडे तुमच्या विरोधकांनी बदनामीचे कारखाने उघडलेत. काहीजण तर लवकरच आपण नेताजी पालकरांप्रमाणे मुसलमानी धर्म पत्करणार, अशी भुमका सोडून दिली आहे! आपल्या आकांक्षेप्रमाणे तकदीर साथ देत नसेल, काहीतरी वेगळी बहादुरी घडवायची संधी मिळत नसेल, तर निदान जे आहे ते तरी सांभाळण्याचा प्रयत्न करा. ह्या आप्तजनांच्या गुप्त पत्रांनी शंभूराजेंची अवस्था खूपच नाजूक करून सोडली होती.
तितक्यात दिलेरखान संभाजीराजांच्या हवेलीमध्ये येऊन त्यांना कुर्निसात करून बोलू लागला, “चला आवरा”, निघा शाहजादे. दोनच दिवसांत आपल्याला भूपालगडावर पोचायचे आहे.” तसा पातशहा अलामगिरांचा स्पष्ट हुकूम आहे.
“असं? आम्ही कोणता मुलुख जिंकावा आणि जिंकू नये, यासाठी थेट दिल्लीहून फरमाने निघू लागली तर!”
स्वतःच्या मनाविरुद्ध शंभुराजांना भूपाळगडाकडे कूच करणे भाग होते. चाकणचा भुईकोट किल्ला छोट्या फौजेनिशी लढवणारा आणि औरंगजेबाच्या मामाला, शाहिस्तेखाला घाम फोडणारा फिरंगोजी नरसाळा हा भूपाळगडाचा किल्लेदार अशी तशी तलवार खाली ठेवणार नाही, उलट जिद्दीने जंग देईल. म्हणून दिलेरखान शंभुराजांना बोलला, ” कळवा आपल्या जातभाईला. म्हणावे जंग टाळा. किल्ला सोडून निघून जा.”
शंभुराजांना दिलेरचा कावेबाजपणा कळत होता. पण गळ्याला अडकवलेल्या माशाप्रमाणे सुटताही येत नव्हते. जगण्यासाठी तडफडही आवश्यक होती. त्यांनी आपल्या खास दूतांमार्फत गडावर खलिता पाठवला. “गड दुर्बल आहे. त्यात दिलेरखानची फौज दांडगी. निष्कारण युद्ध कशाला करता? आबासाहेबांच्या सैन्यांची हानी करू नका.
उजाडता उजाडता किल्ल्यावरून जाबसाल घेऊन निरोपाचा स्वार माघारी आला. युवराजांनी प्रथम फिरंगोजींचे शब्द वाचले, त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता कागद तसाच दिलेरखानाच्या हाती सुपूर्त केला–
“न लढता किल्ला सोडून हात हालवत निघून जाण्याची रीत शिवाजी राजांच्या फौजेत नाही! ती यवनांचीच आहे, हे संभाजीराजे आपण आपल्या याराला का समजावून सांगत नाही?”
खलिता वाचून दिलेरखान रागाने लालबुंद झाला आणि बोलला , खलित्याच्या जबाब द्यायची हि कोणती रीत?
“खानसाहेब, अहो मानी मराठा हा मानाप्रमाणे वागणारच! सारेच काय या संभाजीसारखे दुर्वर्तनी निघणार आहेत?” हि खुली कबुली देताना संभाजीराजांची चर्या विषादाने माखून गेली होती.
फिरंगोजीनी किल्ला लढवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण संभाजीराजांच्या आणि दिलेरखानाच्या आक्रमक झुंजीसमोर मराठ्यांना हार खावी लागली. किल्ला पडतो आहे हे लक्ष्यात येताच मराठा पथकांनी तिथून पोबारा केला. अनेकजण कैद झाले.
सूर्य मावळतीकडे गेला. रक्ताळलेला भूपाळगड अंधाराचा अंगरखा पांघरून आपल्या जखमा लपवण्याचा प्रयत्न करू लागला. दुसऱ्याच दिवशी संभाजी महाराजांचे चार खाजगी सेवक धावतपळत आले. “युवराज, युवराज” अश्या काळीज फोडणाऱ्या हाका देत होते. त्या आवाजाने संभाजी महाराज ताडकन उठले. निश्चितच काहीतर दगाफटका झाला असणार. युवराजांनी हातातली तलवार उंचावली आणि करड्या सुरत सेवकांना विचारले “बोला रे बोला. सांगा काय प्रकार आहे?”
“राजे, खूप अन्याय झाला हो, खूप अन्याय झाला” त्या दुष्ट दिलेरखानाने काल पकडलेल्या सातशेजणांपैकी निम्म्या जणांचे एक एक हात तोडून त्यांना थोटं केलं हो! उरलेल्यांचा एक एक पाय तोडला आणि त्यांना लंगड केलं बघा. अशी विटंबना माणसांची सोडाच पण जनावरांचीबी कोणी केली नसल!”
ते भयंकर वृत्त कानावर पडताच संभाजीराजांचा क्रोधाग्री खवळला. त्यांच्या हाताच्या मुठी वळल्या. संतापाने त्यांनी दात चावले. राजांनी धावत घोड्याच्या पाठीवर आपला राठ हात मारला. संभाजीराजांचा घोडा एकदाचा खानाच्या गोटासमोर एकदाचा येऊन थांबला. जेव्हा भूपाळगडाची कातीव कडसर उतरताना शंभुराजांना दिलेरने पहिले होते, तेव्हाच त्याला पुढच्या भयंकर संकटाची जाणीव झाली होती. शेताच्या बांधात लपून बसलेल्या उंदरासारखा खान आत लपला होता. संतप्त शंभूराजांशी सामना करायची हिम्मत त्याच्यात आता उरली नव्हती.
“डरपोक बुढ्ढ्या बाहेर ये!” बराच वेळ शंभूराजे हाक देत होते.
खूप उशिराने वरच्या लाटा शांत झाल्या. परंतु खवळलेला समुद्र अद्यापि निवळला नव्हता. त्यांनी समोरच्या सैनिकी जमावाकरवी दिलेरखानाला निरोप दिला.
“जा सांगा त्या तुमच्या बुढ्ढ्या दिलेरखानाला–एक संभाजी मोगलांना मिळाला म्हणून काही शिवाजीराजा अजून संपलेला नाही, संपणार नाही!”
रात्री शंभूराजे भयंकर बैचेन होते. कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तोडलेले सातशे मराठे त्यांच्या डोळ्यांसमोर सारखे उभे राहत होते. डोके अक्षरशः ठणकत होते. ते धाडकन उठले. त्यांनी कोपऱ्यातील वरवंटा हाती घेतला. राणूबाईंना आपल्या बंधूंचा क्रोधाची जाणीव झाली होती. त्या पुढे धावल्या आणि शंभूराजेंना पाठीमागून कवळा घातला. बाकीचे सेवकही त्यांच्या मदतीला धावले. सर्वजण शंभूराजेंनी सावरण्याचा प्रयत्न करत होते. “सोडा आम्हाला आक्कासाहेब, सोडा”
कपाळावर हात मारत शंभूराजे बोलले, “राणूआक्का ह्या दरीमध्ये शिवाजीचा हा पोर मुक्कामी असताना, पलीकडे इथून थोड्याशाच अंतरावर सातशे मराठ्यांचे हातपाय तोडले जातात—–ते अमानुष कृत्य करणाऱ्या बदमाषांना जर आम्हाला रोखता आला नसेल, तर ह्या हातांचा काय उपयोग? थांबा, आमचे हे होताच थोटे करून आम्हाला प्रायश्चित्त घेऊ द्या!”
“शंभूबाळ, तुम्हाला आमच्या रक्ताची आण आहे.” तुम्हीच जर जाणूनबुजून असे अपंग होऊ लागलात तर आपल्या मराठी राज्याचं काय?
शंभूराजांनी आपल्या अंगातील शक्तीने एक जोराचा हिसका दिला तसे सारे सेवक बाजूला जाऊन पडले ते पाहताच राणूबाई पुढे धावल्या त्या शंभूराजांच्या पायावर जाऊन कोसळल्या. ” ऐका ना हो शंभूबाळ!! आज तुम्ही आपले हात गमावून बसाल, तर उद्या आमचे काय होईल? आबासाहेबांच्या माघारी तो पापी औरंग्या आपल्या मुलखावर धावून आला, तर त्याच्या घोड्याचे पाय छाटायची ताकद तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातात आहे शंभूराजे?
राणूबाईच्या हंबरड्याने, त्यांच्या कळवळ्याने शंभूराजांच्या हातातला वरवंटा गळून पडला. समोर डेऱ्याचा बळकट खांब उभा होता. शंभूराजांनी सरळ त्या खांबालाच मिठी मारली. खवळलेला हत्ती आपल्या भणभणत्या मेंदूचा ज्वर थंड करण्यासाठी जसा फत्तरावर धडका घेत डोके आपटतो, त्याचप्रमाणे शंभूराजे त्या खांबावर डोळे आदळत होते. मधेच त्याला पकडून मिठी मारत होते. डोळ्यातल्या उष्ण आसवांची सर पुसत हंबरत होते.
“आबासाहेब, खूप चूप चुकलो हो आम्ही, खूप चुकलो!”
संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.
खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.
संदर्भ: ‘संभाजी, विश्वास पाटील’ यांचा पुस्तकातून घेतलेला मजकूर.
2 Replies to “भूपाळगड : सातशे मराठे सैनिक थोटं”