दोस्तीचा हात …
दोनच दिवसात दिलेरखानाच्या दूत नवा खलिता घेऊन शृंगारपुरात येऊन दाखल झाले. कविराजांनी तो खलिता शंभूराजांकडे सादर केला, तेव्हा राजे वैतागून बोलले,
“काई वेडबिड लागलय कि काय त्या बुढ्या खानाला?”
त्यांची धावती नजर खलित्यातल्या ओळींवर फिरू लागली.

“रुस्तुम-ए-दख्खन संभाजीराजे! मेहेरबानी करा. आमच्या शिबिरामध्ये दाखल व्हा. पातशहा औरंजेब गाझी आहे. त्याला सह्याद्रीसह पुरा दख्खन देश जिंकायचा आहे. गुस्ताखी माफ, आपल्या शाही खानदानाच्या मामल्यामध्ये आम्हाला नाक खुपसण्याचा अधिकार नाही. पण तरीही आम्ही आपल्या दिलाचा दर्द जाणतो. तुमच्या पित्याची खरी मोहोब्बत सोयराबाई आणि राजाराम यांच्यावर आहे. फडावरचे सारे कारकून, दरकदार तुमच्यासारख्या मर्द छाव्याला दुश्मनीच्या निगाहाने देखतात. म्हणूनच तुमच्या त्या लंगोटा एवढा रियासतीचा शहजादा म्हणून अपमानित मनानं मिरवण्याऐवजी अलामगिराकडं या. आमच्या दोस्तीचा हात पकडा आज ना उद्या आलमगीर-साहेबांची स्वारी दक्षिणेत येईल. तुमची आमची किस्मत एकदम रोशन होऊन जाईल.”
आपल्या डोळ्यांसमोरचा लखोटा बाजूला करत शंभूराजे बोलले,
“कविराज, दिलेरला लागल्या हाताने जबाब द्या. त्याच पत्र अनुउत्तरित राहता कामाचं नाही.”
“म्हणजे राजन?”
“आमचं शांत राहणं म्हणजे आमची मूकसंमती असा त्यानं गैरअर्थ काढू नये.” शंभूराजांच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडू लागला. तिथेच आपले पाय दुमडून उतरत्या मेजावर कवी कलश मजकूर लिहू लागले-
“खानसाहेब, आम्हांस आपलं मानून आपण सातत्यानं आमच्याविषयी जी चिंता प्रकट करता त्याबद्दल आम्ही खरं तर अल्लाचेच आभार मानायला हवेत. आमचा राजपरिवार गृहभेदाने दुभंगल्याबाबत जी आपणांस खबर प्राप्त झाली आहे, ती सत्यच आहे. मात्र त्यामुळे आपण अधिक आनंदित व्हायचं काहीच कारण नाही. हे वाटण आम्हां सर्वांच्या हाती सुपूर्त करून आमचे आबासाहेब केवढ्या भरवशानं परमुलखात निघून गेले आहेत. त्यांच्या माघार त्यांच्याशी गद्दारी करून हि दौलत आपल्या झग्यामध्ये टाकू म्हणता? असं गैर काही आमच्या हातून घडणं म्हणजे मेरे प्यारे दिलेरभाई, रावणाची मदत घेऊन श्रीरामानेच दशरथविरुद्ध बगावत करणं! खांसाहेब, शिवरायांसारखा पिता दैवी कृपेमुळं लाभला असताना, त्या वटवृक्षाची थंडगार सावली सोडून तुमची सोन्याची लंका आम्हाला हो काय करायची?”
मजकूर सांगता सांगता संभाजीराजांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांचे आपल्या पित्यावरचे आणि स्वराज्यावरचे प्रेम पाहून कवी कलशही सद्गगदीत झाले. इतक्यात काहीसे मनात येऊन युवराजची पावले तिथेच रेंगाळली. अखबार थैली बांधणाऱ्या कवी कलशांना ते म्हणाले,
“थांबा. आम्हांला वाटते ह्या पत्राला एक ताजा कलम जोडून द्यावा.”
“जसा हुकूम.”
दोघेही खाली बसले. युवराजांनी मजकूर सांगितला, दिलेरजी, तुम्हाला आणि तुमच्या पातशाहाला खरेच आमचा पराक्रम इतका आवडत असेल तर आपण दोघेही एक होऊ या. दुसरा एखादा मुलुख जिंकून पातशहांना पेश करू या.”
युवराज कलशांना पुढे बोलले. “हा ताजा कलाम जोडण्यामागे आम्हचा एक हेतू आहे. दिलेरखानाने पुढे केलेला हात पूर्णतः झिडकारण्यामध्ये हशील नाही. एखादा धागा राहू द्यावा.”
“पण राजन, असंगाशी संग हवा कशाला?” कवी कलश उद्विग्न सुरत विचारू लागले.
शंभूराजांची चर्या काळवंडून गेल्यासारखी दिसली. ते हसण्याच्या आव आणत आणि एक दीर्घ सुस्कारा सोडत ते बोलले, कविराज, मनुष्याच्या आयुष्यात वेळा काही सांगून येत नाहीत!”
संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.
खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.
संदर्भ: ‘संभाजी, विश्वास पाटील’ यांचा पुस्तकातून घेतलेला मजकूर.
Dosti asavi tar ashi